मंगळवार, १ मे, २०१८

गरुडाचा पुनर्जन्म

गरुडाचा पुनर्जन्म

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.

त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !

जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.
एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !

150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !

याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात.  आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !

150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !

दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे
एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची
हनुमंत खाडे
9665656592

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

नवी ओळख नवा ध्यास

राम कृष्ण हरी विठ्ठल

भिकारी आणि व्यापारी.
–––––––
एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भिक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला.

त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भिक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भिक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भिक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"

"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भिक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे.
भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.
इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे.

मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भिक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?

बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भिक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे?

जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.

विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.

तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.

कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे.

तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भिक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले,
"व्वा! क्या बात है?
आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य,
आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास,
त्याच्या मनात घर करून गेलं.
तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.

विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.

साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?

आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."

पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."

दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"
पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय. पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे.

मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात.
आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."

भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.

शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला लागू तेव्हा मग
आणखी समजण्यासारखं राहिलंच काय?
होय ना?

*****
हनुमंत अर्जुन खाडे
    ९६६५६५६५९२

बुधवार, १० जानेवारी, २०१८

जीवनात यशस्वी होण्यासाठी गरुडाचे हे 7 गुणधर्म जरूर अनुसरा

गरुडाचे हे 7 गुणधर्म गरुडाला साखळी मध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर घेऊन जातात

गरुड हा एक शिकारी पक्षी म्हणून ओळखला जातो. रॅक्टर्स प्रकारात येणारा हा पक्षी शिकार करतो. गरुड आपणास सर्वाना त्याच्या बद्दल असलेल्या अनेक प्राचीन घटनांशी संबंधामुळे परिचित आहे. सहसा गरुड हे साप, इतर छोटे पक्षी, मासे, छोटे मोठे सस्तन प्राणी यांची शिकार करतात. केवळ गिधाड हा पक्षीच गरूडापेक्षा मोठा असतो. गरुडाविषयी आपन आज अशा गोष्टी जाणून घेऊया ज्या साखळी मध्ये त्याला सगळ्यात वरच्या स्थानावर घेऊन जातात…

1) गरुड कधीही कळप किंवा थव्या मध्ये राहत नाही. तो बाकीच्या पक्ष्यांमध्ये कधीही मिक्स होत नाही. गरुड कायम एकटे उंच आकाशात उडते जिथं बाकीच्या पक्ष्यांना उडणे तर सोडा साधे पोहचता सुद्धा येत नाही.

2) गरुडाची दूरदृष्टी आणि बुद्धिदृष्टी प्रचंड दूरची असते. दुरूनच कोण शत्रू किंवा कोण भक्ष आहे हे भेदण्याची दृष्टी गरूडमध्ये असते.

3) गरुडाला वादळे आवडतात. ज्या वादळात बाकीचे पक्षी शांत झाडावर बसतात किंवा कुठे तरी आसरा घेतात त्याच वादळात गरुड उंच झेप घेऊन त्या वादळांना जणू आव्हान देत असते.

4) सगळ्यात महत्वाचे म्हणजे गरुड दुसर्याने फेकलेले तुकडे किंवा आधीच मेलेलं भक्ष कधीही खात नाही गरुडाचा स्वतःवर एवढा विश्वास असतो की तो स्वतःचे पोट किंवा स्वतःची प्रगती दुसऱ्याच्या तुकड्यावर कधीही भरत नाही.

5) गरुडाचे वैशिष्ठ म्हणजे तो आपला जोडीदार खरच योग्य आहे का नाही याची परीक्षा घेऊनच विश्वास ठेवतो.

6) गरुड स्वतःच्या मुलांना ही अश्याच पद्धतीने तयार करतो की ते कोणतेही आव्हान सहज पार करू शकतील परंतु फुकटेगिरी कधीही शिकवत नाही.

7) शेवटचे पण फार महत्वाचे जेव्हा गरुडाच्या पंखातील बळ कमी होते तेव्हा ते फार उंच टोकावरील पर्वतात आसरा घेऊन स्वताःचे पंख स्वतःच चोचेने उखडून फाडून काढतोे आणि नवीन पंख येण्याची वाट पाहतो.

एकदा का नवीन पंख परत आले की परत तोच दरारा घेऊन उंच उंच आकाशात भरारी मारतो.
परंतु या काळात तो कोणावरही अवलंबून राहत नाही किंवा जिवंत राहण्यासाठी कुणाचीही याचना करत नाही.

याच वैशिष्टये मुळे गरुड अन्नसाखळी मध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर राहते. जीवनात उच्च स्थान प्राप्त झालेल्या व्यक्तीही अश्याच प्रकारे गरुडाचे गुणधर्म पाळत आलेले असतात म्हणून ते त्या मानवी जीवनात उच्च स्थानावर विराजमान असतात.

हनुमंत खाडे